
अहिल्यानगर — समाजातील जातीय व्यवस्था, अंधश्रद्धा, स्त्रीदास्य आणि मतदारदास्य यांसारख्या अमानवी विचारप्रणालींना संपवण्यासाठी “जनलोक मानसशास्त्र क्रांती” या नावाने नवे सामाजिक आंदोलन उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अभियानाचे नेतृत्व करणारे ॲड. कारभारी गवळी यांनी महाराष्ट्रातील जनतेला जागृत होण्याचे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील काही आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांवर अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन प्रबोधन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, लोकशाही मजबूत करायची असेल तर विचारसरणीत बदल करणे अत्यावश्यक आहे.
या आंदोलनात महात्मा गांधी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान नेत्यांच्या विचारांचा आधार घेत समाज परिवर्तनाचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यावर भर दिला जाणार आहे.
पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या माध्यमातून हे आंदोलन राज्यभर राबवले जाणार असून, लवकरच विविध ठिकाणी जनजागृती मोहीम सुरू केली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.










