डॉ. आंबेडकर जयंती विशेष आंदोलन! विचारमुक्तीचा नवा टप्पा
अहिल्यानगर प्रतिनिधी : “ब्लॅक गॅझेट” हे कोणतेही शासकीय प्रकाशन नसून समाजातील अदृश्य मानसिक गुलामगिरी उघड करणारा एक सार्वजनिक बौद्धिक दस्तावेज आहे, असे मत पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले. या दस्तावेजाचा उद्देश व्यक्तींवर टीका करणे नसून समाजातील विचारसरणीतील दोष उघड करणे, अजनुकीय माहिती (NGI) चे विश्लेषण करणे आणि समाजाला RECONSCIO गव्हर्नन्सकडे नेणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारत स्वतंत्र असला आणि संविधानाने समानतेची हमी दिली असली, तरी अनेक सामाजिक निर्णय आजही तर्क, विज्ञान आणि मानवतेऐवजी परंपरा, भीती व अंधश्रद्धांवर आधारित घेतले जातात. हीच स्थिती ‘सबकॉन्शिओ गव्हर्नन्स’ म्हणजेच अदृश्य गुलामगिरी दर्शवते, असे गवळी यांनी नमूद केले.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध दिलेला लढा अजूनही अपूर्ण असून तो पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे. केवळ कायद्यांचे पालन करून चालणार नाही, तर विचारशुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
या आंदोलनात ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, वीरबहाद्दूर प्रजापती, सचिन कुक्कडवाल, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, पोपट भोसले, धनंजय मडके, कैलास पठारे, अशोक भोसले आदींसह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते सहभागी होणार.
“ब्लॅक गॅझेट” हा अंधार दाखवण्यासाठी नव्हे, तर प्रकाश निर्माण करण्यासाठी एक ‘सूर्यनामा’ असल्याचे सांगत गवळी यांनी “समजा — तपासा — सुधारा” हे घोषवाक्य दिले. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त केवळ अभिवादन न करता विचारक्रांती घडवण्याचे आवाहन त्यांनी केले असून, ही लढाई बाह्य शत्रूंविरुद्ध नसून मनातील अदृश्य साखळ्यांविरुद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.










