संविधानामुळेच सामान्य माणसाला राजकारण प्रशासनात येण्याचा मार्ग खुला!
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत त्यांच्या तत्वांचा अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला.उपस्थितांनी “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
तर देशात सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला. प्रकाश थोरात, इंजि. अनिल घाटविसावे, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, प्रथमेश घाटविसावे, आशिष घाटविसावे, सुनील घाटविसावे, प्रियंका निकाळजे, श्वेता गायकवाड, संतोष गायकवाड, सदानंद गायकवाड, सोहम गायकवाड, तन्वी गायकवाड, संजय देवढे, निजाम जहागीरदार, पण्णा लसगरे प्रवीण शेळके,आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सार्वजनिक कार्यकर्ते प्रकाश थोरात यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले. ते म्हणाले की, बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सामान्य माणसाला प्रशासनात येण्याचा मार्ग खुला करून दिला. पूर्वी केवळ काही मोजक्या घटकांपुरते मर्यादित असलेले सत्ताकेंद्र आज सर्व समाजघटकांसाठी खुले झाले आहे, ही बाब संविधानाची मोठी देणगी आहे.
थोरात पुढे म्हणाले की, संविधानाने सर्व नागरिकांना समान न्याय, संधी आणि हक्क दिल्यामुळे वंचित, मागास आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींनाही शासन-प्रशासनात स्थान मिळाले. यामुळे लोकशाही अधिक बळकट झाली असून प्रशासनात सर्व समाजघटकांचे प्रतिनिधित्व वाढले आहे. “हत्ती” म्हणजेच सत्तेच्या केंद्रस्थानी आज सर्व स्तरातील माणसे पोहोचत आहेत, हे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचे फलित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
थोरात यांनी विशेषतः नमूद केले की, महिलांनाही संविधानिक अधिकारांमुळे आज प्रशासनात, राज्यकारभारात आणि देशाच्या वरिष्ठ सभागृहात सन्मानाने पद व प्रतिष्ठा मिळवण्याची संधी प्राप्त झाली आहे. ही सामाजिक परिवर्तनाची मोठी पायरी असून, समानतेच्या तत्त्वाची प्रभावी अंमलबजावणी यामुळे दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी धम्ममित्र अनिल घाटविसावे त्यांनी आवाहन केले की, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांचे जतन करणे आणि समानतेच्या तत्त्वावर समाजाची उभारणी करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. समाजात बंधुता, समता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार करूनच खऱ्या अर्थाने आंबेडकर जयंती साजरी होईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यकर्ते, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.











