
अहिल्यानगर /भिंगार : कॅन्टोन्मेंट शाळेत भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती साजरी करण्यात आली. ह्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना नाट्य-लघुचित्रपट लेखक, अभिनेते, व्याख्याते सुनील राऊत म्हणाले की १४ एप्रिल १८९१ ते १९५६ पर्यंतचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा जीवन प्रवास प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र देणारे बाबासाहेब म्हणजे सकारात्मक विचार आहेत. हेच सकारात्मक विचाराचे बाबासाहेब आपल्या आत आहेत, त्यांना ओळखणं म्हणजेच स्वतःचं मनन, चिंतन करणं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सकारात्मक विचार आहे. बाबासाहेबांमधील सकारात्मकता आपल्याला चांगल्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे, यश मिळवुन देणार आहे. पुस्तकांवर मनापासून प्रेम करणाऱ्या बाबासाहेबांनी अनेक पुस्तकं वाचली. विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांसोबतच अवांतर वाचन करणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रपुरुष, राष्ट्रमाता ह्यांच्या विषयीची पुस्तकं वाचा. देशाचे जबाबदार नागरिक, ‘माणूस म्हणून चांगले घडा, शाळेचं आणि आपल्या भिंगारचं नाव उज्वल करा असेही राऊत मनोगत व्यक्त करतांना म्हणाले. ह्या शाळेचा मी माजी विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान असुन त्यावेळच्या माझ्या शिक्षकांनी माझ्यावर सुसंस्कार केले, घडवलं आणि मी प्रचंड अवांतर वाचन केलं म्हणून मी आज येथे उभा आहे. छावणी परिषदेचे मनोनित सदस्य श्री वसंतराव राठोड ह्यांनीही अध्यक्षपदाचे मनोगत व्यक्त केलं. ह्याप्रसंगी विद्यार्थ्यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी भाषण केलं. संजय शिंदे सर, भोसले सर, मुबीना शेख मॅडम यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन वैशाली शिंदे मॅडम यांनी केले. स्नेहल लवांडे मॅडम यांनी आभार मानले.











