

अहिल्यानगर,प्रतिनिधी-: 12 जून 2025:कापूरवाडी येथे भिल्ल समाजाच्या महिलेला सवर्ण समाजातील धनदांडग्या गावगुंडांनी बेदम मारहाण करून मानवी हक्कांचा निष्कारण चिरडाच घडवून आणला. या अमानुष प्रकारामुळे संतप्त झालेल्या समाजबांधवांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर प्रचंड आक्रोश मोर्चा काढत अन्यायाविरुद्ध रणशिंग फुंकले!
अश्लील शिवीगाळ, मारहाण, आणि धमक्यांनी ग्रस्त झालेल्या महिलेला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणात आरोपींना भारतीय न्याय 2023 अंतर्गत गुन्हे दाखल असूनही, अद्याप एकाही गुन्हेगारास अटक करण्यात आलेली नाही. कारण एकच त्यांच्या मागे राजकीय पाठबळ आहे.
या गावगुंडांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असूनही त्यांची मस्ती संपलेली नाही. वनजमिनींवर अनधिकृत खडी क्रेशर चालवणारे हे गुन्हेगार आदिवासी, दलित समाजातील लोकांना जमिनीवरून उठवतात, त्यांना राहू देत नाहीत, आणि विरोध केल्यास मारहाण करतात — असा खुलासा चौकशीतून समोर आला आहे.
या अमानुष घटनेचा जाब विचारण्यासाठी एकलव्य आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने आदिवासी, बौद्ध, मागासवर्गीय बांधवांनी रस्त्यावर उतरून “आम्ही मरण पत्करू पण अन्याय सहन करणार नाही” अशा गर्जना दिल्या.
राज्य प्रवक्ते अरुण जाधव (वंचित बहुजन आघाडी) यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, “आमच्या भगिनींवर हात टाकणाऱ्यांना संरक्षण देणारे पोलीस आणि त्यांच्यावर थंडपणे पाहणारे अधिकारी जर झोपून राहणार असतील, तर आम्ही त्यांना झोपवून टाकू! हा लढा संविधानिक आहे, पण जर आम्हाला रोखले तर आम्ही दिल्लीपर्यंत धडक मारू!”
प्रा. किसन चव्हाण (राज्य उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी) यांनी इशारा दिला की, “आरोपींना अटक न केल्यास आम्ही विधिमंडळ अधिवेशनात मोठा मोर्चा घेऊन राज्य सरकारला झोपवू. या संघर्षाचा धग कुठे पोहोचेल हे सांगता येणार नाही.”
भारतीय बौद्ध महासभेचे अण्णासाहेब गायकवाड यांनी शांत पण ठाम शब्दांत सांगितले की, “संविधान आम्हाला अधिकार देतो, आणि त्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आम्ही मागे हटणार नाही. हा लढा बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेला आहे, आणि आम्ही तो तसाच पुढे नेणार.”
मोर्चात परवेज शेख, योगेश साठे, अॅड. योगेश गुंजाळ, राजू भिंगारदिवे, अशोक मोरे, नर्सिंग भोसले, विजय गायकवाड, योगेश निकम, इस्माईल शेख आदी कार्यकर्त्यांनी जोरदार उपस्थिती लावली. महिलांची संख्या लक्षणीय होती.

या प्रकाराने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायदा केवळ गरीब, मागास, आदिवासींसाठी आहे का? राजकीय वरदहस्त असलेल्या गुन्हेगारांना कायद्याच्या पलीकडे मोकळं सोडलं जाणार का?
हा लढा आता थांबणार नाही — तो आरोपींच्या अटकेपर्यंत आणि न्याय मिळेपर्यंत चालूच राहणार आहे! असे वंचित बहुजन आघाडीचे अॅड. योगेश गुंजाळ, यांनी सांगितले.










