वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच सुरू होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अहिल्यानगर : शहरातील नागरिकांच्या दीर्घकालीन अपेक्षांना आणि जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मंजूर केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीभवनात जाहीर केले. ही घोषणा शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाली असून, त्यांचे प्रयत्न आता यशस्वी ठरले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुरुवारी विधीभवनात भेट घेत असताना आमदार संग्राम जगताप यांनी महाविद्यालय शहरातच व्हावे यासाठी ठोस निवेदन सादर केले. जिल्ह्यातील नागरिकांना जलद आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, तसेच विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर वैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
या घोषणेमुळे अहिल्यानगर शहरात वैद्यकीय शिक्षण व उपचार यांची नवी दारे उघडणार असून, रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आरोग्य व शिक्षण क्षेत्रात विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अहिल्यानगर शहरातील नालेगाव परिसरात कृषी विभागाची २५ एकर जागा उपलब्ध असून, ती सध्या वापरात नाही. ही जागा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून सोलापूर, पुणे व मनमाडसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गावर आहे. त्यामुळे या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारल्यास अहिल्यानगर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांतील नागरिकांना सुलभ वैद्यकीय सेवा मिळणार आहेत. ही बाब लक्षात घेता नालेगाव येथील कृषी विभागाच्या जागेतच महाविद्यालय सुरू करण्यासाठी योग्य ती प्रशासकीय प्रक्रिया राबवावी, अशी ठोस मागणी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
