ग्लोबल दिवाळी ब्लिस निमित्त पीपल्स हेल्पलाईनचे ॲड. कारभारी गवळी यांचा संदेश
अहिल्यानगर दि. 23 ऑक्टोबर (प्रतिनिधी): आजच्या ग्लोबल दिवाळी ब्लिस निमित्ताने पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने “निसर्ग श्रीमंत भारतीय योजना” या नवयुगीन व परिवर्तनकारी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरकच नाही, तर मानवाच्या संपूर्ण चेतनात्मक क्रांतीचा आरंभ आहे, असे प्रतिपादन पीपल्स हेल्पलाईनचे ॲड. कारभारी गवळी यांनी केले.
ॲड.गवळी म्हणाले, “निसर्ग श्रीमंत भारतीय योजना ही निसर्गाशी एकरूप होण्याची आणि टिकाऊ, आत्मनिर्भर जीवनशैली अंगीकारण्याची दिशा आहे. ही योजना त्या प्रत्येक जागरूक नागरिकासाठी आहे जो निसर्गाला केवळ संसाधन म्हणून नव्हे, तर चेतनस्वरूप सखा म्हणून पाहतो.”
निसर्ग श्रीमंत भारतीय कोण? निसर्ग श्रीमंत भारतीय तो आहे. जो किमान पाच झाडांची लागवड करतो व प्रत्येक झाडाजवळ रेन गेन बॅटरी बसवतो, ज्यामुळे भूजलपातळी वाढते. आपल्या परिसरात नॅनो धनराई नर्सरी स्थापन करतो जी स्वावलंबन व पर्यावरणसंवर्धनाचे प्रतीक आहे.
सौर नॅनो ऊर्जा प्रणाली बसवून, विद्युत वाहनांचा वापर करतो व पेट्रोल-डिझेलमुक्त भारत घडवतो. घराभोवती हरितावरण राखतो, हवेचा, ध्वनीचा व मानसिक प्रदूषण टाळतो.सर्व सजीवांना नात्यातील भावनेने वागवतो, कारण प्रत्येक जीवात त्या विश्वचेतनेचा अंश आहे.
नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय टाळतो व टिकाऊ जीवनशैली स्वीकारतो. संपूर्ण क्रांतीचे तीन आधारस्तंभ म्हणजे भौतिक परिवर्तन – झाडे, जलसंधारण, सौरऊर्जा, व हरित जीवनशैली.मानसिक परिवर्तन – प्रेम, शांतता, आत्मसंयम, आणि वादमुक्त समाज.चेतनात्मक परिवर्तन – एकात्मिक ज्ञानसिद्धांत (IKT), सूक्ष्म चेतनेचा विकास आणि कार्यक्षम अध्यात्म.
ॲड.गवळी यांनी सांगितले की, “हीच ती संपूर्ण क्रांती — जी शरीर, मन आणि चेतना या त्रिसूत्रीवर आधारित आहे. ही क्रांती राजकीय किंवा आर्थिक नसून अंतर्मनातून उगवलेली सामाजिक क्रांती आहे.”
निसर्गपाल भावनेचा जयघोष “जो मनुष्य निसर्गपाल बनतो, तो केवळ पर्यावरण वाचवत नाही, तर जीवनाचे खरे अध्यात्म अनुभवतो,” असे ॲड.गवळी म्हणाले.
तो ‘मी’ आणि ‘माझे’ या सीमांपलीकडे जाऊन सर्वांसाठी कार्य करतो आणि निसर्गपाल धर्म स्वीकारतो — जो शोषण, अहंकार आणि संकीर्णतेच्या पलीकडे आहे.
अंतिम संदेश देतांना ॲड. कारभारी गवळी यांनी शेवटी आवाहन केले“ही दिवाळी केवळ दिव्यांची नाही, तर चेतनेच्या प्रकाशाची दिवाळी असावी.आपल्या अंतःकरणातील प्रकाशाला जागवून आपण म्हणूया —मीच निसर्ग आहे, मीच शक्ती आहे, मीच प्रकाश आहे.
जय निसर्गपाल। जय वंदे मातरम्। शुभ ग्लोबल दिवाळी ब्लिस!”

