निसर्गधर्म हीच खरी आध्यात्मिक क्रांती –
(अनिल घाटविसावी प्रतिनिधी/ महाराष्ट्र राज्य समाचार) अहिल्यानगर :-आजचे अध्यात्म आणि राजकारण हे आत्मकेंद्रित स्वार्थाच्या भोवऱ्यात अडकले असून, खऱ्या अर्थाने मानवतेची आणि निसर्गाची सेवा करण्याचा मूलभूत उद्देश हरवला आहे, असे प्रतिपादन अॅड. कारभारी गवळी यांनी केले.
ते म्हणाले, “आज भारतीय समाजामध्ये धर्माचे विकृत स्वरूप पसरले आहे. कोणी वैकुंठप्राप्तीसाठी लगबग करत आहे, कोणी मोक्षाच्या हव्यासात सेवा विसरत आहे, तर कोणी देवाच्या नावाखाली सत्ता, संपत्ती आणि वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. ही स्थिती सामान्य जनतेला भ्रमात टाकणारी आहे.”
निसर्गधर्माची संकल्पना मांडताना अॅड. गवळी म्हणाले, “निसर्गधर्म म्हणजे वृक्षारोपण, जलसंधारण, आणि सर्व सजीवांप्रती करुणा हीच खरी अध्यात्मिक तपश्चर्या आहे. हा धर्म कोणत्याही मंदिरात जन्मलेला नाही; तो झाडांच्या सावलीत, नद्यांच्या प्रवाहात आणि पक्ष्यांच्या आवाजात प्रकट होतो.”
त्यांनी पुढे सांगितले की, “माझा मोक्ष, माझे वैकुंठ, माझे ब्रह्मसाक्षात्कार या वृत्तीमुळे अध्यात्म हे वैयक्तिक हव्यासाचे माध्यम बनले आहे. या स्वार्थी माहितीची शुद्धी करून ‘निसर्गधर्म’ हा लोकसेवेचा आणि सहवेदनेचा धर्म बनतो.”
राजकीय सत्तेवरील टीका करताना ते म्हणाले, “आज राजकीय व्यवस्था देखील ‘माझेच सरकार’, ‘माझ्या मुलाचेच भविष्य’, ‘माझ्याच घरात सत्ता’ या केंद्रित विचारांनी दूषित झाली आहे. त्यामुळे सामान्य जनता अंधानुकरण करून अक्कलमारीच्या दिशेने ढकलली जात आहे.”
निसर्गधर्म हाच खरा धर्म असून, त्याला कोणताही जात, पंथ, प्रदेश किंवा भाषा सीमा लावू शकत नाही. “झाडे लावा, झाडे जगवा”, “पाणी वाचवा”, “प्रत्येक कृतीत निसर्गसेवा” हेच त्याचे सिद्धांत आहेत, असे मत त्यांनी मांडले. या साठी अशोक सब्बन कैलास पठारे प्रकाश थोरात शाहीर कानू सुंबे अशोक भोसले, संदीप, बबलू खोसला, भगवान जगताप, आनंदा आढाव,यमुना जी मस्के, अॅड.अमित थोरात, यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
उपसंहारात त्यांनी आवाहन केले, “आपण वैकुंठाच्या आरक्षणासाठी धावणाऱ्या अध्यात्माच्या झगड्यातून बाहेर पडून, झाडांच्या मुळांना पाणी देणाऱ्या प्रेमाच्या निसर्गधर्माकडे वळावे. ‘माझे जीवन, माझे झाड, माझी रेन बॅटरी’ या घोषणेने नवा अध्यात्मिक क्रांतीचा प्रारंभ करावा.”
