नियंत्रण ठेवून मंदिराच्या पैशातून सरकारने विकास कामे करावीत जनतेची मागणी

अहिल्यानगर सोनई: – शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रस्ट थेट बरखास्त करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील श्रद्धेचे प्रमुख केंद्र असलेल्या या देवस्थानात गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अनियमितता, अपारदर्शक कारभार आणि बिनधास्त लूट सुरू होती, अशी तिखट टिप्पणी सरकारच्या सूत्रांनी केली आहे.
भक्तांनी अर्पण केलेल्या कोट्यवधी रुपयांचा विनियोग न करता त्याचा अपहार करणाऱ्या ट्रस्टींनी आपली खुर्ची आणि नातेसंबंधांचा गैरफायदा घेतल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. ट्रस्टच्या निधीतून खासगी ठेकेदारांना कामे मिळवून देणे, नियमबाह्य खर्च करणे, आणि लेखापालांशी संगनमत करत देणग्यांचा गैरवापर करण्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेपही झाल्याची चर्चा आहे. भक्तांनी मंदिराला दान केलेल्या रकमेतून राजकीय मंडळी भ्रष्टाचार करून आपली स्वतःची सत्ता राखण्यासाठी व संपत्ती जमा करण्यासाठी या पैशाचा वापर करीत असतील तर ही दुर्दैवी असून, भक्तांच्या भावनेला दुखावणारी बाब आहे. याकरिता सरकारने मंदिर पैशातून जनतेच्या विकासाची कामे करावीत अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.
राज्य सरकारने आता याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. देवस्थानावर श्रद्धा ठेवणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या भावना दुखावल्याने राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “भक्तांची लूट थांबवण्यासाठी हा निर्णय गरजेचा होता,” असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले आहे.
