बांधकाम उपविभाग अ.नगर ठरलंय भ्रष्टाचाराच केंद्र!
अहिल्यानगर प्रतिनिधी :- नगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर चेतक इंटरप्रायजेस कंपनीकडून सुरू असलेली नियमबाह्य टोलवसुली आणि महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबतचा मुद्दा आज विधानसभेत जोरदार गाजला. पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी या घोटाळ्यावर थेट सरकारला जाब विचारला. फक्त 132 कोटींच्या प्रकल्पासाठी तब्बल 700 कोटी रुपयांचा टोल गोळा करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी ही बाब जनतेच्या सुरक्षेशी संबंधित लूट असल्याचा ठपका ठेवला. डांबरीकरणाच्या नावाखाली फक्त पॅचवर्क करण्यात आले असून, ॲम्ब्युलन्स, क्रेन आणि आपत्कालीन सेवेचा अभाव देखील गंभीर चिंतेचा विषय असल्याचं त्यांनी सभागृहात ठणकावून सांगितले.
या घोटाळ्यामागे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याने दाते यांनी थेट बांधकाम उपविभाग, अहिल्यानगरला या संपूर्ण भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू ठरवले आहे. दोषी कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून ही आर्थिक लूट थांबवावी आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
नगर-पुणे महामार्गासह इतर अनेक देखभाल दुरुस्ती प्रकल्पांमध्ये मोठया प्रमाणावर अनियमितता आणि आर्थिक घोटाळे घडल्याचे समोर येत असून, या सर्व प्रकरणांची तात्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जनतेतून जोर धरू लागली आहे. शासकीय नियम आणि प्रक्रिया धाब्यावर बसवून कामे सुरू असून, यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांचीही भूमिका संशयास्पद असल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
