सकल मातंग समाजात उत्साहाचे वातावरण
अहिल्यानगर (प्रतिनिधी):अहिल्यानगर शहरातील अप्पु हत्ती चौकाला आता “लहूजी वस्ताद साळवे चौक” असे नवे नाव देण्यात आले असून, या ऐतिहासिक नामकरणानंतर सकल मातंग समाजात आनंद, अभिमान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नामकरणाचा निर्णय जाहीर होताच परिसरात फटाके फोडून, ढोल-ताशांच्या गजरात आणि पेढ्यांचे वाटप करून समाजबांधवांनी आनंद व्यक्त केला. अनेकांनी या क्षणाला “इतिहासाच्या अभिमानाचे पुनरुज्जीवन” असे संबोधले.
कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे तसेच संबंधित प्रशासनाचे विशेष आभार मानले. समाजातील प्रतिनिधींनी सांगितले की, “लहूजी वस्ताद साळवे हे स्वातंत्र्यपूर्व काळातील शूर पराक्रमी समाजसुधारक आणि क्रांतिकारी विचारवंत होते. त्यांच्या नावाने चौकाचे नामकरण होणे म्हणजे सामाजिक न्याय, समानता आणि आत्मसन्मानाच्या मूल्यांचा गौरव होय.”
या नामकरणामुळे लहूजी वस्ताद साळवे यांच्या प्रेरणादायी कार्याची पुन्हा एकदा आठवण समाजमनात ताजी झाली आहे. अनेक युवक संघटनांनी या ठिकाणी लवकरच लहूजी वस्ताद साळवे यांची जयंती सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
संपूर्ण शहरात “जय लहूजी वस्ताद!” या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. या प्रसंगाने समाजात अभिमान, एकता आणि प्रेरणेची नवी चेतना निर्माण झाली आहे.
