आदिवासी समाजाचा एल्गार
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – बंजारा, धनगर व इतर समाज घटकांनी आदिवासी प्रवर्गात आरक्षणाची मागणी केल्याच्या निषेधार्थ, सकल आदिवासी समाज बांधव, अहिल्या नगर यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर “आदिवासी आरक्षण बचाव जन आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार आहे.
आदिवासी समाजाचे आरक्षण हे त्यांच्या ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणावर आधारित आहे. या आरक्षणात इतर समाजांना समाविष्ट करण्याचे प्रयत्न संविधानविरोधी असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर आज सकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चादरम्यान “आमचे आरक्षण आमचे हक्क”, “संविधानाचा सन्मान करा”, “आदिवासींच्या हक्कांवर गदा नको” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमणार आहे.
मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनाने आदिवासी आरक्षण संरक्षित ठेवावे, तसेच इतर कोणत्याही समाजाला या प्रवर्गात समाविष्ट करण्याचे प्रयत्न तात्काळ थांबवावेत, अशी मागणी करण्यात येणार आहे.
या मोर्चात जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना, कार्यकर्ते आणि समाजनेते मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, समाजात याबाबत तीव्र आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे
