
पुणे/वाघोली|२ऑगस्ट२५महाराष्ट्र राज्य समाचार:-
पुणे वाघोली येथे थोर साहित्यिक आणि लोकशाहीवादी लढवय्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित राहून प्रा. श्री. विश्वनाथ पाटोळे यांनी महाराष्ट्र राज्य समाचार शी संवाद साधताना अण्णाभाऊ साठे यांचे कार्य, विचार आणि आंबेडकरी चळवळीशी असलेले नाते यावर सखोल विचार मांडले.
प्राचार्य श्री. पाटोळे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर जर कोणीतरी आंबेडकरी विचारांची मशाल उंचावली असेल तर ते अण्णाभाऊ साठे होते. त्यांच्या ‘ फकीरा’ या कादंबरीचे अर्पण बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीस करण्यात आले, तर ‘बुद्धा शपथ’ या लेखात त्यांनी धम्माचं चित्र उभा केलं, त्यांनी बाबासाहेबांना अखंड मानवजातीसाठी प्रेरणास्थान मानले.” त्यांनी असेही सांगितले की, अण्णाभाऊंची साहित्यसंपदा ही केवळ दलित नव्हे तर संपूर्ण उपेक्षित, वंचित, श्रमिक समाजाच्या अनुभवांची साक्ष आहे.
“शाहू, फुले, आंबेडकर या विचारसरणीतून अण्णाभाऊंनी आपल्या साहित्य, लोककला आणि लढ्याच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची चळवळ अधिक गतिमान केली,” असे प्राचार्य श्री. पाटोळे यांनी स्पष्ट केले. त्यांनी अण्णाभाऊंच्या सामाजिक जाणीवेचा गौरव करत सांगितले की, “अण्णाभाऊंनी केवळ लेखणीच नव्हे तर संघटनेच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली. त्यांच्या साहित्याचे मूळ हे श्रमिक वर्गाच्या दुःखात आहे.”
