डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विचारक्रांतीची हाक!

पुणे, प्रतिनिधी : देशाला स्वातंत्र्य मिळून संविधानाने समानतेची हमी दिली असली, तरी नागरिकांचे विचार खरोखर स्वतंत्र आहेत का, असा मूलभूत प्रश्न आजही कायम असल्याचे मत पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ डॉ.आंबेडकर यांच्या विचारांच्या पार्श्वभूमीवर अॅड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले. या प्रश्नाला भिडण्यासाठी “सबकॉन्शिओ गव्हर्नन्स ब्लॅक गॅझेट” हा दस्तावेज पुढे आणण्यात आला आहे.
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला हा दस्तावेज कोणताही शासकीय गॅझेट नसून समाजाचा “बौद्धिक आरसा” आणि “सामाजिक एक्स-रे अहवाल” असल्याचे अॅड. गवळी यांनी स्पष्ट केले. व्यक्तींना लक्ष्य करण्याऐवजी समाजातील विचारसरणीतील दोष उघड करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
देश स्वतंत्र असला तरी निर्णयप्रक्रिया अजूनही परंपरा, भीती, अंधश्रद्धा आणि तर्कविरहित श्रद्धांवर आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले. “सबकॉन्शिओ गव्हर्नन्स” हीच अदृश्य गुलामगिरी असून ती मानवी मन, निर्णय आणि स्वातंत्र्याच्या भासावर प्रभाव टाकते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत सांगितले की, जातिव्यवस्था आणि अन्यायाविरुद्धचा लढा आजही संपलेला नाही. केवळ कायदे करून समाजपरिवर्तन होत नाही, तर विचारांची शुद्धी आवश्यक आहे. हीच खरी जयंतीची दिशा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सबकॉन्शिओ गव्हर्नन्स कशी कार्य करते याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जातीय मानसिकता, अंधश्रद्धा, भीतीवर आधारित परंपरा आणि तर्कशून्य श्रद्धा या सर्व अजनुकीय माहितीचे (NGI) परिणाम आहेत. यामुळे व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर नियंत्रण येते आणि स्वातंत्र्य केवळ भास बनून राहते.
नेतृत्वाच्या भूमिकेवर भाष्य करताना अॅड. गवळी म्हणाले की, हा दस्तावेज कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवतो. जेव्हा नेतृत्व तर्कशक्तीऐवजी भावना भडकवते आणि स्वार्थासाठी कार्य करते, तेव्हा शासनातील अनियमितता, भ्रष्टाचार आणि निष्क्रियता वाढते.
“ब्लॅक गॅझेट” हा अंधाराचा नव्हे, तर प्रकाशाचा घोष असल्याचे सांगत त्यांनी RECONSCIO गव्हर्नन्स ही पुढील दिशा असल्याचे नमूद केले. यामध्ये एकात्मिक ज्ञान सिद्धान्त (IKT), अजनुकीय माहितीचे परिवर्तन आणि विवेकाधारित निर्णयप्रक्रिया यांचा समावेश आहे.
डॉ. आंबेडकर जयंती हा केवळ अभिवादनाचा दिवस नसून विचारक्रांतीची सुरुवात असल्याचे सांगत त्यांनी आवाहन केले की, “समजा — तपासा — सुधारा.”
समारोप करताना अॅड. गवळी म्हणाले, “ही लढाई बाह्य शत्रूंविरुद्ध नसून आपल्या मनातील अदृश्य साखळ्यांविरुद्ध आहे.”
