
बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला- प्रा. विश्वनाथ पाटोळे
पुणे (प्रतिनिधी) – वाघोली येथील बहुजन चळवळीचे अभ्यासक आणि बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक प्रा. विश्वनाथ पाटोळे यांनी आज महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले.डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या विचारांमुळे दलित, शोषित, वंचित समाजाला नवी दिशा, आत्मसन्मान आणि जगण्याचा हक्क मिळाला, असे प्रा. पाटोळे यांनी सांगितले. “दलितांचे कैवारी, मानवतेचे पुरस्कर्ते आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांनी देशाला समानता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविला. त्यांच्या संघर्षाची आणि प्रबोधनाची परंपरा आजही आम्हाला प्रेरणा देते,” असे ते म्हणाले.
प्रा. पाटोळे पुढे म्हणाले की, “आजच्या पिढीने बाबासाहेबांचा विचार केवळ स्मरणात ठेवायचा नाही तर आचरणात आणायचा आहे. सामाजिक विषमता नष्ट करून समतेचा समाज निर्माण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “जय भीम, जय संविधान, जय भारत”च्या घोषणा देत बाबासाहेबांना भावपूर्ण अभिवादन केले.

