
गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास!
अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक उदगार येथील पीपल्स हेल्पलाईनचे सामाजिक कार्यकर्ते,प्रकाश थोरात यांनी महाराष्ट्र राज्य समाचार जवळ बोलतांना काढले.
राजीव गांधींच्या हत्येनंतर उद्भवलेल्या हृदयद्रावक परिस्थितीची आठवण करून देताना थोरात आमच्याशी बोलत होते, ते म्हणाले की,त्या काळातील एक प्रसंग आजही भारतीय राजकारणातील मानवी मूल्यांचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणून उभा राहतो. राजीव गांधी हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यानंतर सोनिया गांधी आणि प्रियांका मद्रासला पोहोचल्या. सुरक्षा कारणास्तव न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता, मात्र कर्तव्य आणि प्रेम यांच्यापुढे सोनिया ठाम राहिल्या.
त्या स्थळी राजीव गांधींचे पार्थिव आणि थोड्याच अंतरावर त्यांचे निष्ठावान सुरक्षा अधिकारी प्रदीप गुप्ता यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. राजीव गांधींच्या पार्थिवावर पुष्पहारांची रेलचेल होती, पण प्रदीप गुप्ता यांच्या पार्थिवावर एकही फुल नव्हते. हा वेदनादायी क्षण सोनिया गांधींच्या नजरेतून सुटला नाही. त्या शांतपणे पुढे गेल्या… राजीव गांधींच्या पार्थिवा जवळील मोगऱ्याचा एक सुगंधी हार उचलला, आणि तो हळुवार पणे प्रदीप गुप्ता यांच्या पार्थिवावर ठेवला, “स्वतःचे सर्वस्व गमावलेल्या क्षणी, वेदनेने कोसळलेल्या मनातूनसुद्धा दुसऱ्याच्या त्यागाचा असा सन्मान—यालाच संस्कार, उदारता आणि भारतीयता म्हणतात. हा मोगऱ्याचा हार फक्त फुलांचा नव्हता; तो कृतज्ञतेचा, आदराचा आणि मानवतेचा सुवास होता.”
थोरात पुढे म्हणाले, “आजच्या राजकारणात फक्त द्वेष आणि कृतीशून्यता आहे. पण सोनिया गांधींनी त्या क्षणी दाखवलेली मानवता, जात, धर्म,पंथ,पक्ष, मतभेद—या सगळ्यांच्या वरची आहे. अशा संस्कारी नेतृत्वा मुळेच भारताची लोकशाही मजबूत राहिली आहे. थोरात शेवटी म्हणतात की,“त्या मोगऱ्याच्या हारात भारताचा आत्मा होता. आणि अशा नेत्या आजही भारतीय राजकारणाची गरज आहेत.”
