पीपल्स हेल्पलाइनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ – ॲड. कारभारी गवळी

अहिल्यानगर:-(महाराष्ट्र राज्य समाचार प्रतिनिधी) : आजच्या युगात ‘सत्याग्रह’ आणि ‘अहिंसा’ या संकल्पना केवळ सामाजिक किंवा राजकीय आंदोलनापुरत्याच मर्यादित नाहीत, तर त्या ब्रह्मांडातील चेतना, ऊर्जा आणि निसर्गाच्या शाश्वत नियमांशी सुसंगत आहेत. “एकात्म ज्ञान सिद्धांतानुसार (IKT), चेतना आणि ऊर्जेचा सुसंगत समन्वय म्हणजेच खरा सत्याग्रह,” असे प्रतिपादन पीपल्स हेल्पलाइनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी बोलताना स्पष्ट केले.
सत्याग्रह : चेतना आणि कार्यक्षमतेचा समन्वय
सत्याग्रह म्हणजे केवळ अन्यायाविरुद्ध संघर्ष नव्हे, तर चेतना आणि कार्यक्षमतेचा वैज्ञानिक तसेच आध्यात्मिक समन्वय आहे, असे सांगून ॲड. गवळी म्हणाले, “विकासाचा प्रत्येक टप्पा निसर्गाशी संघर्ष न करता तिच्या सहकार्याने साधला पाहिजे. सत्याग्रह म्हणजे सत्याशी — म्हणजेच निसर्गाशी — एकरूप होण्याचा आग्रह आहे.”
अहिंसा : निसर्गात हस्तक्षेप न करणे,अहिंसा म्हणजे फक्त मानवी हिंसा टाळणे नाही, तर निसर्गाच्या प्रवाहात हस्तक्षेप न करणे, असे त्यांनी सांगितले. “अहिंसेचा खरा अर्थ म्हणजे सृष्टीतील प्रत्येक घटकाशी सुसंवाद आणि सहजीवन. हीच शाश्वत आणि समृद्ध जीवनशैलीची पायाभरणी आहे,” असे ॲड. गवळी म्हणाले.
विश्वशासनाचा अवमान आणि आधुनिक संकटे आज जगासमोर उभ्या असलेल्या पाणीटंचाई, हवामान बदल आणि प्रदूषण या समस्या म्हणजे विश्वशासनाचा (Cosmic Governance) अवमान असल्याचे त्यांनी नमूद केले. “माणूस जेव्हा निसर्गाच्या नियमांविरुद्ध वागतो, तेव्हा तो स्वतःच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करतो. त्यामुळे विकासाचा मार्ग चेतना आणि निसर्गाशी सुसंगत ठेवणे — हाच आधुनिक सत्याग्रह आहे,” असे ॲड. गवळी यांनी स्पष्ट केले.
रेन गेन बॅटरी आणि धनराई : सत्याग्रहाचे प्रत्यक्ष रूप आहे. ॲड. गवळी यांनी पुढे सांगितले की, “रेन गेन बॅटरी हे केवळ पाणी साठवण्याचे तंत्र नसून निसर्गपाल धर्माचे प्रत्यक्ष पालन आहे. पावसाचे पाणी जमिनीत साठवून हे तंत्र जलचक्र पुन्हा प्राणवान करते. त्याचप्रमाणे ‘धनराई’ फळबाग योजना वाळवंटासारख्या भूमीला पुन्हा हरित करण्याची साधना आहे.”
या दोन्ही उपक्रमांमधून अहिंसेचे आचरण, निसर्गाशी सहजीवन आणि चेतनात्मक विकास दिसून येतो, असे ते म्हणाले.ॲड. गवळी यांच्या मते, “सत्याग्रह, अहिंसा आणि एकात्म ज्ञान सिद्धांत यांचा संगम म्हणजे चेतनात्मक कर्मयोग. प्रत्येक रेन गेन बॅटरी बसवणे आणि प्रत्येक धनराई झाड लावणे ही केवळ कृती नसून भूमीवरील आणि विश्वावरील पूजा आहे.”
ॲड. गवळी यांनी शेवटी सांगितले की, “IKT सत्याग्रह हा फक्त सामाजिक किंवा राजकीय आंदोलन नाही, तर शाश्वत आणि विश्वाशी सुसंगत जीवन जगण्याचा प्रवास आहे. तो गांधीजींच्या सत्याग्रह आणि अहिंसेचा आध्यात्मिक, वैज्ञानिक व पर्यावरणीय विस्तार आहे. रेन गेन बॅटरी आणि धनराईसारख्या उपक्रमांद्वारे ही तत्त्वे प्रत्यक्षात उतरवता येतात.” हे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवून जागतिक स्तरावर पर्यावरणीय आणि सामाजिक चळवळींना नवी, पवित्र दिशा दिली जाऊ शकते, असे ॲड. गवळी यांनी प्रतिपादन केले.
