

माजलगाव नगर पालिका गैरव्यवहार प्रकरण
माजलगाव प्रतिनिधी :- माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याला ६ लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. नगर उत्थान योजनेतील २ कोटीच्या रस्त्याच्या कामातील बिलासाठी व इतर कामांतील अडथळे दूर करण्यासाठी त्याने ठेकेदाराकडे १२ लाखांची लाच मागितली होती. तक्रारीची पडताळणी करून छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने पिताजी नगरी येथे सापळा रचून चव्हाणला अटक केली. त्याच्या ताब्यातून ९४,८०० रुपयांची रोकडही जप्त झाली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर अतिरीक्त सत्र न्यायाधीश राजश्री परदेशी यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.
चव्हाण याच्या अटकेनंतर आरोग्य तपासणी तब्बल १२ तासांनी करण्यात आली. अटकेनंतर रात्री लगेच वैद्यकीय तपासणी आवश्यक असताना ती शुक्रवारी दुपारी करण्यात आली. दरम्यानच्या वेळेत चव्हाणला पोलीस उपनिरीक्षक माकने यांच्या खोलीतील खुर्चीवर बसवून त्याची बडदास्त ठेवण्यात आली होती. या काळात त्याचे नातेवाईकही पोलीस ठाण्यात उपस्थित होते, यामुळे कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
