
अहिल्यानगर : ग्लोबल वॉर्मिंग, पाणीटंचाई आणि वाढते तापमान या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे शास्त्रीय व्यवस्थापन हाच खरा मार्ग असल्याचे मत पीपल्स हेल्पलाईनचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले.
ॲड.गवळी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जगभरात पावसाचे प्रमाण पूर्णपणे कमी झालेले नाही; परंतु पडणाऱ्या पावसाचे योग्य नियोजन आणि साठवण होत नसल्यामुळे पाणीटंचाई व उष्णतेची समस्या वाढत आहे. “पाऊस निसर्ग देतो; परंतु त्या पावसाचे मातीतील ओलाव्यात रूपांतर करणे ही मानवाची जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी “मॉइश्चर नॅनो ओशन” ही संकल्पना मांडताना सांगितले की, पावसाचे पाणी जमिनीत मुरवून ते मातीतील सूक्ष्म छिद्रांमध्ये साठवले, तर दीर्घकाळ टिकणारा भूमिगत ओलावा तयार होतो. हा ओलावा झाडांच्या मुळांना सतत पाणी पुरवतो, जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवतो आणि पर्यावरणीय संतुलनास हातभार लावतो.
यासाठी “रेन गेन बॅटरी” ही साधी आणि किफायतशीर यंत्रणा प्रभावी ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले. स्थानिक स्तरावर दगड, खडी, वाळू आणि मुरूम यांच्या साहाय्याने तयार केलेल्या या व्यवस्थेमुळे पाणी खोलवर मुरते, भूजल पातळी वाढते आणि मातीतील ओलावा टिकून राहतो. प्रत्येक घर, शेत आणि मोकळ्या जागेत अशी यंत्रणा उभारली गेली, तर स्थानिक पातळीवर मोठा बदल घडू शकतो, असे ते म्हणाले.
गवळी यांनी पुढे “रेन गेन फॉरेस्ट”ची संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, मातीतील सातत्यपूर्ण ओलाव्यामुळे नैसर्गिकरीत्या झाडांची वाढ वेगाने होते. परिणामी कार्बन डायऑक्साइडचे शोषण वाढते, तापमान कमी राहते आणि जैवविविधता वृद्धिंगत होते.
“ग्लोबल वॉर्मिंगविरुद्धची लढाई मोठ्या घोषणांपेक्षा स्थानिक पातळीवरील कृतीतून जिंकली जाईल. प्रत्येक नागरिकाने पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठवण्याचा संकल्प करावा,” असे आवाहन अड. कारभारी गवळी यांनी केले.
