आजचा मानव अनेक पातळ्यांवर यशस्वी वाटतो – विज्ञानाने त्याला चमत्कारिक भौतिक साधने दिली, समाजशास्त्राने व्यवस्थांची जाणीव दिली. तरीही मानवी समाज आज गंभीर संकटांच्या उंबरठ्यावर उभा आहे – पाणीटंचाई, जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाचा ऱ्हास, जातीयता, धर्मांधता, विषमता आणि भ्रष्टाचार ही संकटं दिवसेंदिवस वाढत आहेत. हे सर्व प्रश्न बाह्य नाहीत; ते आपल्या अंतर्मनातील अविकसित चेतनेचे प्रतिबिंब आहेत.
भ्रष्टाचार, धर्मांधता, पर्यावरणीय ऱ्हास, सामाजिक विषमता यांसारख्या समस्या हे केवळ कायद्याचे वा धोरणांचे अपयश नाही. यांची मुळे स्वार्थ, अहंकार, करुणेचा अभाव आणि निसर्गाप्रती तुटलेली नाळ यांत आहेत. त्यामुळे या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधायचा असेल, तर आपल्याला “उन्नत चेतना” म्हणजेच आत्मिक जागृतीची गरज आहे.
उन्नत चेतना म्हणजे भारतीय परंपरेतील “रामबाण” या संकल्पनेप्रमाणे, उन्नत चेतना ही एक अंतिम, अचूक आणि सर्वांगीण उपाय आहे. ही चेतना म्हणजे स्वार्थाच्या पलीकडे जाण्याची वृत्ती,नैतिक विवेकाचा जागर,करुणा, सहवेदना आणि सहजीवनाची समज
ही केवळ बौद्धिक समज नसून एक आंतरिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे.म्हणून चेतना जागवण्याचे मार्ग उन्नत चेतना प्राप्त करण्यासाठी केवळ ग्रंथज्ञान पुरेसे नाही तर यासाठी काही मूलभूत आध्यात्मिक मार्गांची गरज आहे. त्या करिता 1.आत्मचिंतन व ध्यान – स्वतःच्या विचार-भावनांचं निरीक्षण.2. करुणा व सहवेदना – इतरांच्या वेदनेशी एकरूप होणं.3. निसर्गाशी सुसंवाद – पर्यावरणाशी सजीव नातं जोडणं.4. निःस्वार्थ सेवा – अहंकाराच्या भिंती कोसळवणारी साधना.5. कला आणि सौंदर्याची अनुभूती – चेतनेला सृजनशीलता आणि संवेदनशीलतेने समृद्ध करणं.
क्रमश:
