
पद्मश्री डॉ. अभय बंग यांचे अहिल्यानगरमध्ये प्रेरणादायी व्याख्यान — “जगावं कशासाठी आणि कसं?” या विषयावर मनस्पर्शी विचारमंथन
अहिल्यानगर प्रतिनिधी:- येथील आरोग्य सदन हॉस्पिटल च्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध समाजसेवक, जनआरोग्य चळवळीचे प्रणेते,पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी “जगावं कशासाठी आणि कसं?” या अत्यंत अर्थपूर्ण विषयावर व्याख्यान दिले. त्यांच्या विचारमंथनाने उपस्थित श्रोत्यांना अंतर्मुख केले आणि जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला.
डॉ. बंग यांनी आपल्या अनुभवातून ग्रामीण आरोग्य, समाजसेवा, आणि जीवनातील अर्थपूर्णता यांवर आधारित अनेक उदाहरणे दिली. “जगणे हे केवळ स्वतःपुरते नसून समाजाच्या हितासाठी असले पाहिजे. आपली प्रत्येक कृती ही मानवतेच्या सेवेसाठी असेल, तरच खरे आयुष्य सार्थकी लागते,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विचारांनी उपस्थितांमध्ये प्रेरणेचा नवा संचार झाला.
“आज जगभरातील दारू, सिगारेट आणि प्रोसेस्ड फूड उद्योगांच्या जाहिरातींच्या आक्रमणामुळे माणसाचे आरोग्य धोक्यात आले आहे,” असा गंभीर इशारा पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी दिला. त्या आकर्षक जाहिराती आरोग्यदायी जीवनशैलीपासून माणसाला दूर नेत आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की या तथाकथित आधुनिक सवयींमुळे हृदयविकार, मधुमेह, स्थूलता आणि मानसिक तणाव यांसारखे आजार झपाट्याने वाढत आहेत.
डॉ. बंग पुढे म्हणाले, “आरोग्य ही फक्त आजार नसण्याची अवस्था नाही. स्व-स्थ, अ-स्वस्थ आणि स्वतःमध्ये स्वस्थ — हीच खरी आरोग्याची व्याख्या आहे. जेव्हा माणूस स्वतःशी, समाजाशी आणि निसर्गाशी संतुलन साधतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने निरोगी ठरतो.” त्यांनी “आरोग्य स्वराज्य” ही संकल्पना मांडताना स्पष्ट केले की, लोकांचे आरोग्य लोकांच्या हाती असले पाहिजे, सरकार, डॉक्टर किंवा औषधांवर अवलंबून राहणारे नव्हे, तर सजग, जबाबदार नागरिकांनी स्वतःचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी घ्यावी.
त्यांच्या या विचारांनी उपस्थितांमध्ये नवा आरोग्यदायी दृष्टिकोन निर्माण झाला की, खरी आरोग्यक्रांती औषधांनी नाही, तर सजगतेने आणि जीवनशैलीतील बदलांनी घडेल.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी, आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी डॉ. बंग यांचे कार्य अनुकरणीय असल्याचे सर्व मान्यवरांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे संयोजक डॉ. धनंजय वारे,डॉ. महेश जरे आरोग्य सदन हॉस्पिटल यांनी व पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात, एस. डी. ए. संस्थेचे अरुण जगताप, डेव्हीड अवचित्ते, सुभाष आल्हाट, सत्कार केला.

