पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ | महाराष्ट्र राज्य समाचार :- थोर साहित्यिक, लोककवी आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आता ऑडिओ स्वरूपात उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अण्णाभाऊंचे विचार आणि शब्द अधिक व्यापक प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती देताना डॉ. मिलिंद कसबे यांनी सांगितले की, “साहित्यिक समितीचे सचिव प्राचार्य डॉ. संजय शिंदे आणि समितीतील सर्व सदस्य यांच्या विशेष पुढाकाराने ही डिजिटल जबाबदारी पेलणं शक्य झालं.” या उपक्रमाअंतर्गत अण्णाभाऊ साठे यांची साहित्यखडे, कथा, ललित लेखन आणि लोकवाङ्मयाचे विविध पैलू ऑडिओ स्वरूपात डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे साहित्य केवळ वाचनापुरते मर्यादित राहणार नसून, ऐकण्यायोग्य माध्यमातून ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा दुर्दम्य प्रयत्न होणार आहे.
शासनाच्या वतीने राबवत असलेल्या या उपक्रमामध्ये समितीच्या सर्व सदस्यांचा विशेष सहभाग आहे या मध्ये प्राचार्य डॉ. संजय शिंदे,डॉ. बळीराम गायकवाड,डॉ. सोमनाथ कदम,डॉ. शरद गायकवाड,प्राचार्य माधव गादेकर,डॉ. दिलीप चव्हाण,शिवा कांबळे,डॉ. प्रमोद गारोडे,डॉ. अंभोरे,डॉ. सचिन साठे,डॉ. विजय कुमठेकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी मोलाची भूमिका बजावली असे डॉ. कसबे यांनी ऋण व्यक्त केले.
डॉ. कसबे म्हणाले,आज वारसा जपण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळत असून “या प्रकल्पामागे केवळ साहित्य जतन करणे हा हेतू नसून, अण्णाभाऊंचे विचार जनमानसात पोहोचावेत, त्यांच्या संघर्षमय वाटचालीची जाणीव पुढील पिढ्यांनाही व्हावी, हाच आमचा उद्देश आहे.”
